मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे नागपूर येथील आंदोलन स्थगित



टीईटी सक्ती रद्द करणे, वस्ती शाळा शिक्षकांची जुनी सेवा, जुनी पेन्शन, पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी यासह इतर प्रश्नासाठी झालेल्या आंदोलनात जालना जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी...

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने यशवंत स्टेडियम येथे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या आंदोलनासाठी जालना जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते.

शिक्षक भारतीचे संस्थापक माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, विदर्भ समन्वयक अतुल देशमुख आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, सरचिटणीस भरत शेलार, कार्याध्यक्ष दिनेश खोसे, किशोर कदम, संतोष ताठे, दीपक दराडे, यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे हे आंदोलन झाले. 

आंदोलन सुरू असताना आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न पोचवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने टीईटीची अट कार्यरत शिक्षकांसाठी रद्द करावी, वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकपासूनची सेवा जोडण्यात यावी, 2005 पूर्वी / नंतर नियुक्त सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी, 15 मार्च 2024 संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा. पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्याबाबत व इतर मागण्यांचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आले.

प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे मुख्य सचिव यांना विषय समजून घेण्यासाठी बैठक घेण्यासाठी आदेश दिले. त्यानंतर स्वतः बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यामुळे नागपूर येथे सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. याविषयी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे. 

जालना जिल्ह्यातून या आंदोलनासाठी जालना जिल्हाध्यक्ष देवेंद्र बारगजे, कार्याध्यक्ष गणेश फुकट, ज्ञानेश्वर राऊत, गजानन घोडके, दिगंबर गाडेकर, महादू तांबे, बाबासाहेब कडोस, भानुदास मसलेकर, रामेश्वर सवडे यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. 

Post a Comment

Previous Post Next Post