स्वराज्य संकल्पना- छत्रपती शिवाजी महाराज बालवयात असताना त्याकाळी देशभरात मुघलांनी हैदोस घातलेला होता विजापूरचा आदिलशहा अहमदनगरचा निजामशाह या सत्तांनी महाराष्ट्र काबीज केलेला होता. दिवसाढवळ्या जनतेची लूट सुरू होती. महिला सुरक्षित नव्हत्या. अशावेळी स्वराज्य संकल्प शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतून बाल शिवाजीच्या मनात स्वराज्य निर्मितीचे बीज रोवण्यात आले. बाल शिवाजींनी आपल्या सवंगड्यासह अगदी कोवळ्या वयात तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले व तिथून स्वराज्य निर्मितीचा पाया रचला गेला.
मात्र हे सगळं करणं एवढं सोपं नव्हतं कारण मावळ प्रांतातील बहुतांश वतनदार हे आदिलशहा, निजामशहा व मुघल बादशाह यांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. तलवारीच्या बळावर शिवाजी महाराजांनी अनेकांना आपल्या सोबत घेतले हळूहळू स्वराज्याचा विस्तार केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण जीवन कार्याचा विचार करताना अफजलखानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे छाटणे, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक या प्रमुख घटनांचा उल्लेख करावा लागतो. हे कसोटीचे क्षण होते परंतु अशा प्रसंगावर धैर्याने मात करुन औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाला वठणीवर आणणारा शुरवीर म्हणून नाव लौकीक मिळविला.
अफजलखानाचा वध-
छत्रपती शिवाजी महाराजांची वाढणारी ताकद लक्षात घेऊन विजापूरचा आदिलशहा अस्वस्थ झालेला होता त्यामुळेच त्याने अफजल खान या बलाढ्य ताकद असणाऱ्या सरदाराला स्वराज्यावर आक्रमण करण्यास पाठवले त्याने विशाल गडाच्या भोवती वेढा टाकला व अनेक दिवस तिथे तळ ठोकून राहिला. शेवटी निरुपाय म्हणून महाराजांनी त्याची भेट घेण्याचे ठरवले मात्र भेटीत तो दगा फटका करणार याची जाणीव महाराजांना होती. त्यामुळेच महाराज अगदी सावध होते. शेवटी खानाने दगा फटका केला व महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. या भीमपराक्रमाची नोंद आजही जगभरातील इतिहास संशोधक घेतात.
सुरतेची लूट- स्वराज्यावर आलेले दुसरे महत्त्वपूर्ण संकट म्हणजे शाहिस्तेखानाने केलेले आक्रमण. हा शाहिस्तेखान स्वराज्याची लूट करत सर्वत्र फिरत होता. त्याने रयतेवर अनेक अत्याचार केले. अखेर महाराजांनी लाल महल इथे जाऊन त्याची बोटे छाटली व बादशहा औरंगजेब यांना योग्य तो संदेश दिला.
शाहिस्तेखानाने स्वराज्याचे केलेले नुकसान भरून काढण्याचे महाराजांनी ठरवले व त्यासाठी औरंगजेबाचे महत्त्वपूर्ण आर्थिक स्थान असलेले ठिकाण सुरत निवडले. औरंगाबादकडे जात असल्याची आवई उठवून शिवाजी महाराज सुरतेकडे रवाना झाले व सुरतेहून स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मुद्देमाल जप्त करण्यात आला व औरंगजेबाला अद्दल घडवली.
पुरंदरचा तह व आग्रा भेट-
सुरतेची लूट केल्यानंतर बादशहा औरंगजेब खवळला होता. त्याने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याचा प्रमुख सेनानी मिर्झाराजे जयसिंग याला महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. पुरंदर येथे घनघोर युद्ध झाले त्यामध्ये मुरारबाजीने प्राणाची शर्थ केली मात्र पुरंदर हातून गेला व महाराजांनी एक पाऊल मागे येत स्वराज्याची होणारी हानी रोखण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत पुरंदर येथे तह केला त्यानुसार स्वराज्यातील अनेक गड किल्ले मुघलांच्या ताब्यात देण्यात आले व संभाजी राजे यांना बादशहाची मनसबदारी घेण्यास भाग पाडण्यात आले. या तहातच आग्रा भेटीची बीजे रोवण्यात आली. शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे येऊन त्यांना भेटावे अशा प्रकारचा प्रस्ताव मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडून देण्यात आला. त्यानुसार १२ मे १६६६ रोजी शिवाजी महाराजांची व बादशहा औरंगजेब यांची दिल्ली दरबारी भेट झाली. त्यामध्ये जाणीवपूर्वक महाराजांचा अपमान करण्यात आला. महाराज तडकाफडकी दरबारातून निघून गेले याचा राग आल्याने औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजर कैदेत बंद केले. अखेर आजारी पडल्याचे सोंग घेऊन महाराजांनी आपल्या सवंगड्यांना दिल्लीबाहेर हळूहळू पाठवले व आग्र्यातून सुटका करून घेण्याची योजना आखण्यात आली. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन अखेर मोठ्या शिताफीने शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले व साधूच्या वेशात स्वराज्यात परतले. या घटनेमुळे औरंगजेब बादशहाचे नाक कापले गेले.
शिवराज्याभिषेक- रयतेचे स्वतःचे राज्य असावे व राज्याभिषेक केल्याशिवाय त्याला इतर सर्व राजांकडून मान्यता मिळत नाही ही जाणीव कारभाऱ्यांनी करून दिल्यामुळे शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे निश्चित केले. त्यानुसार शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारोभार आणि पदे वाटून देण्यात आली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून संभाजी महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.
लोककल्याणकारी राजा-
राज्याभिषेक नंतर शिवरायांनी मोगल, आदिलशाहा, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी राजकारण केले पण लोककल्याणचे धोरण त्यांनी कधीही सोडले नाही. महाराज धर्मनिरपेक्ष, न्यायी, समतावादी, निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न होते. त्यांचे राजकारण जातीयवादी, धर्मवादी, भाषावादी नव्हते तर लोककल्याणकारी होते. म्हणूनच आज चारशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याला लोक कल्याणकारी रयतेचे राज्य या दृष्टीने पाहतात व कायम वंदन करतात. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन. त्यांचा लोकल्याणाचा विचार लक्षात ठेवून त्यानुसार राज्यकर्त्यांनी कारभार केल्यास हा देश सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. हीच खऱ्या अर्थाने महाराजांना मानवंदना असेल.
लेख - देवेंद्र बारगजे (जालना)

मुद्देसूद विषय मांडून महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे.
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने महाराजाचे विचार मांडले खूप खूप आभारी
ReplyDelete