विद्यार्थ्यांनो, आई-वडिलांचे ऋण फेडा, त्यांचा सांभाळ करा- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके

सैनिकी विद्यालयात १२ वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न 

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बीड, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच एक चांगले व्यक्ती बनून आई-वडिलांचे ऋण फेडावे व त्यांचा सांभाळ करावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव सोळंके यांनी सैनिकी विद्यालयात आयोजित १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी केले.

          नवगण शिक्षण संस्था राजुरी नवगन संचलित सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बीड येथे १२ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांचे सैनिकी विद्यालय परिसरात आगमन झाल्यानंतर सेना पदक प्राप्त मेघराज कोल्हे व विजयकुमार धारणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विद्यार्थ्यांनी सैनिकी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. सैनिक विद्यालयाचे शिक्षक डॉ. विनोदचंद्र पवार यांनी संग्रहित केलेल्या जुनी नाणी, नोटा व वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ योगेशभैय्या क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्‍हणून बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची उपस्थिती लाभली. अंजनवती हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप जगताप सर तसेच बोरखेड हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू जोगदंड सर , सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस ए सर, जेष्ठ शिक्षक मेहबूब पठाण सर व पालक प्रतिनिधी डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. 

        सांस्कृतिक विभागाचे नामदेव साळुंके सर यांनी गायलेल्या "इतनी शक्ती हमे देना दाता" या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री डाके एस. ए. यांनी केले व सूत्रसंचालन बिभीषण किलमिसे सर यांनी केले. याप्रसंगी जय मल्हार गीतावर विद्यार्थ्यांनी अडागळे सर व साळुंके सरांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असे नृत्य पाहुण्यांच्या समोर सादर केले. १२ वी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना या वेळी फेटे बांधून व गुलाबाचे फुल देऊन त्यांना निरोप देण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके साहेब या वेळी बोलताना म्हणाले की, "अभ्यासा सोबतच चांगले व्यक्ती, चांगला नागरिक होऊन समाज व आई-वडिलांचे ऋण फेडा. आई वडिलांचा सांभाळ करा, उच्च ध्येय गाठण्यासाठी नियोजन करा , तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल " असे ते म्हणाले. शिवाय अतिशय शिस्तबद्ध सैनिकी संचलन, नामदेव साळुंके सर यांचे स्वागत गीत, विद्यार्थ्यांचे नृत्य व सुनियोजित कार्यक्रमाचे त्यांनी कौतुकही केले.



         याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ योगेशभैय्या क्षीरसागर म्हणाले की, ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण देण्याचे स्वर्गीय काकूंचे स्वप्न येथे साकार होताना पाहून आनंद होतो. सैनिकी विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख वाढत असून भविष्यात आवश्यक त्या सर्व सुविधा संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाची कॅण्डल थीम प्रा. रवींद्र झोडगे सर व प्रशांत करपे सर यांच्या संकल्पनेतून साकार झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ विनोदचंद्र पवार सर यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व कनिष्ठ प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



मालक विरहित दुकानाचा नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात!!

सैनिकी विद्यालयात विना मालक दुकानाची सुरुवात यावेळी करण्यात आली. केवळ भाव फलक पाहून विद्यार्थ्यांनी पाहिजे त्या वस्तू स्वतः घेणे आणि तिजोरीमध्ये तेवढी रक्कम टाकण्याचा मालक विरहित दुकानाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा अंगीकृत करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेकडून सुरू करण्यात आला आहे, या उपक्रम वर्षभर सुरू राहील, अशी माहिती सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस ए यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post