महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम सध्या जोमाने सुरू आहे. शहरातील अतिक्रमणे हा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश देण्यात आल्याने आता व्यवसायिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या व्यवसायिकांचे करोडोंचे नुकसान होणार आहे. तर छोट्या व्यवसायिकांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने अतिक्रमण धारकांनी सदरचे अतिक्रमण दि.७ मार्च २०२३ पर्यंत काढून घ्यावीत. असा आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे. तसा सुचना फलक जामखेड शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आला आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याच्या कामाची जामखेड शहरातून सुरूवात झाली आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणामुळे हे काम करण्यात अडथळे येत आसल्याच्या पार्श्वभूमीवर हा फलक लावण्यात आला आहे.
जामखेड शहरातील बाजारपेठ मोठी आहे. नगर बीड या रस्त्यावर मोठ मोठी दुकाने आहेत. त्यातच काही अतिक्रमण धारक टपऱ्या टाकून आपले व्यवसाय करत आहेत. अतिक्रमण असलेल्या टपऱ्या अनेक वेळा हटवण्यात आल्या. काही दिवस उलटल्यावर ते टपऱ्याधारक पुन्हा टपऱ्या टाकून आपला व्यवसाय सुरू करताना आजवर पाहायला मिळाले. परंतु जे मालकी हक्काचे दुकाने आहेत त्यांचीही बरीच बांधकामे शासकीय हद्दीत येतात. त्यामुळे या टपऱ्या व पक्की बांधकामे ही सर्वच आता उध्वस्त होण्याची भीती येथील व्यवसायिकांना आहे. यामध्ये अनेकांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे. तर काही छोट्या व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
अ दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रहदारीमुळे रस्त्याची रुंदी वाढणे ही काळाची गरज बनली आहे. समृद्धी महामार्गासारखी मोठ-मोठी रस्ते आज देशात होत आहेत. प्रत्येक शहरे हे राष्ट्रीय महामार्गाने जोडली जावीत, हे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. व ती काळाची गरजही आहे. त्यामुळे जामखेड शहरातून जाणारा हा महामार्ग शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकेल. परंतु ते होत असतानाच अनेक व्यवसायिकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. हे नाकारता येणार नाही.
Tags
जामखेड