गायञी बारगजेच्या वाढदिवसा निमित्त मुलींसाठी 1 मे पासून जामखेडला महिनाभर मोफत तायक्वांदो प्रशिक्षण


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
   अहमदनगर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने मे ते 31 मे असे एक महिना मुलींसाठी स्वसंरक्षणार्थ तायक्वांदो या खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे संस्थापक सचिव संतोष बारगजे यांनी त्यांची मुलगी कु. गायत्री संतोष बारगजे हिच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला आहे. 

   मुलींनी निर्भीड व्हावे, वेळप्रसंगी स्वतःचे स्वसंरक्षण करावे, या उदात्त हेतूने संतोष बारगजे यांनी यापूर्वी वेळोवेळी त्यांच्या मुलींच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे मोफत तायक्वांदो प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. त्यामध्ये हजारो मुलींनी आजवर सहभाग नोंदविला आहे. यातून अनेक खेळाडूही निर्माण झाले आहेत. तायक्वांदो हा खेळ शालेय स्तरापासून ते संघटना पातळीवर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळला जातो. 

   संतोष बारगजे यांनी जामखेड येथे 17 जून 1994 रोजी पहिले तायक्वांदो प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्यानंतर 1998 पासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये जीन-सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर ची स्थापना केली. या संघटनेला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या शिखर संघटनेने जिल्हा संघटना म्हणून मान्यता दिली. आजपर्यंत या संघटनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशिक्षण वर्ग चालतात ग्रामीण भागातून व शहरी भागातून अनेक गुणवंत खेळाडू निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागातील गरजू मुलींनी तायक्वांदो सारखे स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे त्यांनी या तंत्रशुद्ध खेळामध्ये सहभागी व्हावे या हेतूने 2016 या सालापासून सातत्याने दोन महिने तीन महिने एक महिना दीड महिना पंधरा दिवस असे वेळोवेळी मोफत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले. आणि अतिशय तळमळीने मुलींना हा खेळ शिकवला. 

   पूर्वीची जीन-सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर म्हणजेच सध्याची अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशन या संघटनेचे सचिव संतोष बारगजे सर यांची मुलगी कुमारी गायत्री संतोष बारगजे ही एक उत्कृष्ट तायक्वांदो खेळाडू आहे. 19 मे रोजी तिचा वाढदिवस असतो यापूर्वी तिच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बाजारतळ येथे मोकाट जनावरांसाठी व पक्षांसाठी पाणपोई सुरू केली. ती आजही वर्षभर सुरूच असते. यावेळी मात्र गायत्रीच्या वाढदिवसानिमित्त मुलींसाठी एक मे पासून 31 मे पर्यंत दररोज सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत मुलींसाठी मोफत तायक्वांदो प्रशिक्षण दिले जाणार आहे. बाजारतळ येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर या ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर राबवले जाणार आहे. त्यासाठी मोफत नोंदणी सुरू असून बाजारतळ येथील श्रीस्वामी समर्थ मोबाईल व गायत्री ब्युटी पार्लर अँड साडी सेंटर या ठिकाणी या शिबिरासाठी नोंदणी सुरू आहे. ज्या विद्यार्थिनींना अथवा महिलांना प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी  व्हायचे आहे त्यांनी वरील ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करावे. 
   या तंत्रशुद्ध तायक्वांदो सारख्या ऑलिम्पिक व स्वसंरक्षण कलेचा जास्तीत जास्त मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post