महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
जामखेड तालुक्यातील मोहा शिवारातील हापटेवाडी येथील बाळु भानुदास हापटे या ४५ वर्षीय व्यक्तीने मोहा गावचे शिवारातील हापटेवाडी शेत गट क्रमांक ५८१ मधील शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हापटवाडी तालुका जामखेड येथील बाळासाहेब भानुदास हापटे वय ४५ स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना वैजनाथ हापटे यांनी दिली. संजय कोठारी हे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सदरचा मृतदेह कोठारी यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतुन आणून सरकारी दवाखान्यात दाखल केला आहे.
यानंतर खबर देणारे वैजीनाथ आजीनाथ हापटे यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मृतदेहाचा पंचनामा करताना मयत बाळु भानुदास हापटे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यानुसार पोलीस कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत असल्याने त्यानुसार फिर्याद घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे हे करत आहेत.