संत वामनभाऊंनी चोरी करायला आलेल्या चोरांना जेऊ घातले - नारायण महाराज दौंडआज राम महाराज शास्त्री आळंदी यांचे कीर्तन


 जामखेड प्रतिनिधी : " संत वामनभाऊ महाराज यांचे कार्य महान होते. त्यामुळेच आज सर्वत्र वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे. भाऊ जितके कडक होते तितकेच प्रेमळही होते चोरी करायला आलेल्या चोरांनाही त्यांनी जीव घातले" असे प्रतिपादन नारायण महाराज दौंड यांनी केले. आज मंगळवारी राम महाराज शास्त्री आळंदी यांचे कीर्तन होईल 

जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ गड या ठिकाणी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:45 वाजता पुष्पवृष्टी होऊन संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी झाली व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. 

 संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ वर्षापासून जमादारवाडी येथे भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते. 

येथे सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात
मंगळवारी दादासाहेब महाराज सातपुते यांचे प्रवचन झाले सात ते नऊ या वेळेत ज्ञानकैवल्य वारकरी शिक्षण संस्था राजूरीचे संचालक नारायण महाराज दौंड यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 

झुंजार ते एक विष्णुदास जगीं ।
पापपुण्य अंगीं नातळे त्यां ।।

या अभंगावर अतिशय गोड कीर्तन केले. 
विष्णुदास या शब्दाचा अर्थ सांगताना त्यांनी सांगितले जे वैष्णव आहेत अर्थात जे वारकरी आहेत ते विष्णुदास आहेत संत वामन भाऊ हे भगवान शंकराचा अवतार होते आणि त्याचबरोबर वैष्णव होते अर्थात भगवान श्री विठ्ठलाचे ते भक्त होते व विसाव्या शतकातील एक महान संत म्हणून त्यांची खाती होती. एकदा श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे चोरी करण्यासाठी चोर आले होते भाऊंना ते कळल्यानंतर त्या चोरांना त्यांनी आपले सेवेकरी पाठवून बोलावून घेतले त्यांची विचारपूस केली व ते उपाशी आहेत हे लक्षात आल्यानंतर भाऊंनी त्यांना आग्रह करून जेऊ घातले. सकाळी उठल्यानंतर घरी जा असा सल्ला दिला व घरी जाताना प्रत्येकाला धान्य दिले त्या चोरांवर दया दाखवल्यामुळे ते चोरही बदलले त्यांना आपण करत असलेले काम हे चुकीचे आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरी करायचे सोडून दिले व भाऊंकडून तुळशीच्या मळा धारण केल्या हा संत वामन भाऊंचा महिमा आहे. कीर्तन झाल्यानंतर सायंकाळी आरती करण्यात आली व नंतर आलेल्या सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

 मंगळवारी अर्जुन महाराज नेटके यांचे प्रवचन तर सायंकाळी राम महाराज शास्त्री आळंदी
 यांचे कीर्तन होईल. बुधवारी दत्तात्रय महाराज डुचे यांचे प्रवचन तर शिवचरित्रकार आकाश महाराज भोंडवे यांचे कीर्तन होईल. गुरुवारी मच्छिंद्र महाराज राऊत यांचे प्रवचन तर सायंकाळी गहिनीनाथ महाराज खेडकर घाटशीळ पारगाव यांचे कीर्तन होईल. शुक्रवार दिनांक 14 रोजी दुपारी चार ते सहा दिंडी प्रदक्षिणा व सायंकाळी 9 ते 11 रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव यांचे कीर्तन होईल शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते 11 श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत श्री विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होईल. 

दररोज सकाळी पहाटे चार ते सहा काकडा, सहा ते सात विष्णु सहस्त्रनाम, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, दहा ते बारा गाथा भजन, चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ, रात्री सात ते नऊ हरिकीर्तन व नंतर हरिजागर. किर्तन संपल्यानंतर दररोज आलेल्या सर्व श्रोत्यांची अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी या संपूर्ण उत्सवाचा लाभ घ्यावा व यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संत वामनभाऊ गड सप्ताह समिती व जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.






Post a Comment

Previous Post Next Post